ऑस्ट्रेलियातील एका महिलेला त्यांच्या घरामागील अंगणात कोळी किड्याची एक नवीन प्रजाती सापडली. 18 महिन्यांपूर्वी अमांडा डी जॉर्जने पहिल्यांदा आठ डोळ्यांचा कीटक पाहिला होता. परंतु अलीकडेच हा कोळी किडा पुन्हा शोधण्यात अमांडा यशस्वी झाल्या.
न्यू साउथ वेल्सच्या थिरुल येथील निसर्गप्रेमी डी जॉर्ज यांनी एक वर्षापूर्वी आठ डोळ्यांचा एक निळा चेहरा असणारा कोळी किडा पाहिला होता. त्यांनी पटकन या कोळी किड्याची काही छायाचित्रे घेतली आणि ती ‘बॅकयार्ड प्राणीशास्त्र’ या फेसबुक ग्रुपवर अपलोड केली. या कोळी किड्याचे वर्णन “भव्य निळे डोळे” असे केले.
ही पोस्ट कोळी किडा तज्ज्ञ जोसेफ शुबर्ट यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी अमंडा डी जॉर्ज यांना पुन्हा तो किडा पकडण्यास सांगितले. शेवटी, अनेक महिन्यांच्या शोधानंतर, दोन आठवड्यांपूर्वी पुन्हा अमंडा यांना तो कोळी किडा सापडला. त्यांनी एका रिकाम्या कंटेनरमध्ये त्याला ठेवलं.
गंमत म्हणजे त्यांना आणखी एक कोळी किडा सापडला. जंपिंग स्पायडेर एकमेकांना खाऊ शकतात, हे अमांडा यांना माहीत असल्यामुळे त्यांनी दोन्ही किड्यांना वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवून मेलबर्नमधील तज्ञ शुबर्ट यांच्याकडे पाठविले. आता काही दिवसानंतर या कोळी किड्यांचे औपचारिक नाव आणि वर्णन जाहीर होईल.
अमांडा डी जॉर्ज म्हणाल्या की, कोळी किड्याच्या नवीन प्रजातीस ओळखण्यास मदत करणे खूप आनंददायक होते. ‘हे खूप रोमांचक आहे! विज्ञानाला काही योगदान देण्यात सक्षम झाल्यामुळे खूप आनंद झाल्याचे त्या म्हणतात.