पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यास अवघे पाच दिवस बाकी असतानाच, संरक्षण मंत्रालयाने देशभरातील 55 बोर्डांच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. सध्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगत, मंत्रालयातर्फे बोर्डाच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.
संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या चार मुख्यालयांना अधिसूचना पाठवली आहे. यात प्रशासकीय कारणास्तव सध्या कॅन्टोन्मेंट निवडणुका घेणे शक्य नसल्याने बोर्डाच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढवल्याचे नमूद केले आहे. कॅन्टोन्मेंट कायदा 2006 च्या कलम 14 नुसार, हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे, खडकीसह देशभरातील 55 बोर्डांच्या सदस्यांचा कार्यकाळ वाढणार आहे.
दरम्यान, या निवडणुका आता ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्ट हा पावसाळा असल्याने, त्यावेळी निवडणुका होणार की सर्व बोर्डांना पुन्हा मुदतवाढ मिळून, डिसेंबरपर्यंत निवडणुका लांबणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.