शिरूर (प्रतिनिधी) – नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 1) सकाळी सात वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती शिरूर नगर परिषद सभागृह नेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांनी दिली.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अशोक पवार, माजी आमदार बाबुराव पाचर्णे, पोपटराव गावडे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, किशोर राजेनिंबाळकर, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, मनसुख गुगळे, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर उपस्थित राहणार आहेत.
शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर पाबळ फाट्यानजीक शिरूर नगर परिषदेची नवीन तीन मजली प्रशासकीय इमारत उभी राहिली असून, नुकतेच या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे 14 कोटी रुपये खर्चातून उभ्या राहिलेल्या या इमारतीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व अद्ययावत दालन असून, सर्व विभागांसाठी स्वतंत्र दालने आहेत.
जनरल बोर्ड मिटींगसाठीचे भव्य व अद्ययावत सभागृह हे या नवीन इमारतीचे खास आकर्षण आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमधील सर्व कामकाज संगणकीकृत असून, नगरसेवक विजय दुगड यांच्या संकल्पनेतून ही अद्यावत इमारत उभी राहिली आहे.