लंडन – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचा कर्करोग वेगाने पसरत असून त्यांची दृष्टी क्षीण होत चालली आहे. ते फारफारतर आणखी तीन वर्षे जगू शकतील असा दावा एका आंतरराष्ट्रीय माध्यमाने रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अर्थात एफएसबीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने केला आहे.
पुतीन यांचा अगोदरच मृत्यू झाला असून त्यांच्याऐवजी त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आता रशियाचा कारभार पाहत असल्याचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने केल्यामुळे खळबळ उडाली असताना आता ही नवी बातमी समोर आली आहे. त्यात पुतीन जिवंत असल्याचे सूचित करण्यात आले असून त्यांची दृष्टी क्षीण होत चालली असल्याचे म्हटले आहे.
ते अजून तीन वर्षे जगतील असाही दावा करण्यात आला आहे. त्याहुन महत्वाचे म्हणजे रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जी लावरोव यांनी या कुठल्याही विषयावर भाष्य न करताना पुतीन चांगले असून त्यांना कोणताही आजार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुतीन चांगले आहेत ही बातमी रशियाच्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या एका माजी गुप्तहेराला पाठवलेल्या संदेशातून उघड झाली असल्याचेही सांगण्यात आले. बोरीस कार्पिकोव्ह असे त्याचे नाव आहे.
पुतीन यांची दृष्टी दिवसेंदिवस अंधुक होत चालली आहे. त्यामुळे त्यांना जे काही सांगायचे आहे अथवा म्हणायचे आहे, ते एका कागदावर मोठ्या शब्दांत लिहून द्यावे असे आम्हाला सांगण्यात आले आहे. एका कागदावर एकच शब्द इतक्या मोठ्या आकारात लिहिण्याची सूचना देण्यात आली असल्याचे त्या हेराला पाठवलेल्या संदेशात म्हटले असल्याचा दावा न्यूज. कॉम. एयूने केला आहे. दरम्यान, लावरोव यांनी हे सगळे दावे फेटाळले आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात पुतीन 70 वर्षांचे होतील आणि ते रोज सगळ्यांना भेटतील असे त्यांनी म्हटले आहे.