पाचगणी – क्षुल्लक कारणावरून महाबळेश्वरच्या माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे यांच्या कुटुंबीयांवर सोमवारी (दि. 20) रात्री 8.30 च्या सुमारास मेटतळे, ता. महाबळेश्वर येथे तलवारीने प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात रोकडे कुटुंबातील चार जणांसह पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेने महाबळेश्वरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रोकडे यांच्या फिर्यादीवरून योगेश शिंदे, कुमार शिंदे यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर हल्लेखोर पळून गेले आहेत.
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे स्मरण करण्यासाठी महाडला जाण्यापूर्वी रोकडे कुटुंबीयांनी आधी महाबळेश्वरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आपल्या आधी रोकडे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केल्याचा राग योगेश शिंदे यास आला. तोदेखील आपल्या साथीदारांना घेऊन महाडला पोहोचला. तेथे त्यांची रोकडे कुटुंबीयांशी बाचाबाची झाली. तू वर ये, तुला बघून घेतो, अशी धमकी योगेश शिंदेने श्रद्धा रोकडे यांचे पती उमेश रोकडे यांना दिले. महाड येथून शिंदे टोळी मेटतळे येथे आली. तेथे शिंदे टोळीने जमाव जमवला. त्यांच्याकडे हॉकी स्टिक, काठ्या पीव्हीसी पाइप, तलवारी होत्या. ही टोळी गोकुळ ढाब्याजवळ दबा धरून बसली होती. महाबळेश्वरला परत निघालेले रोकडे कुटुंबीय रात्री 8.30 च्या दरम्यान मेटतळे येथे पाहोचले. तेथे दबा धरून बसलेल्या शिंदे टोळीने त्यांची वाहने अडवली. यावेळी चारचाकी वाहनात पाच, तर मोटारसायकलवर दोन जण होते.
त्यांच्यावर शिंदे टोळीने हल्ला केला. काही जणांना काठ्या, हॉकी स्टिक आणि पाइपने मारहाण करण्यात आली, तर काही जणांवर तलवारीने वार करण्यात आले. यात मीरा रोकडे (वय 55) व दीपक भट (वय 43) यांच्यावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. रमेश रोकडे (वय 58) व उमेश रोकडे (वय 38, सर्व रा. नगरपालिका सोसायटी महाबळेश्वर) यांना काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यातील जखमींवर महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, त्यांना पुढील उचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी उमेश रोकडे यांनी रात्री उशिरा महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्य सूत्रधार योगेश शिंदे, कुमार शिंदे, संजय शिंदे, बबलू पारठे आणि 18 ते 25 वर्षे वयोगटातील अनोळखी 14 जणांवर भादंवि कलम 307, 323, 324, 143, 144, 147, 148, 149, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महाबळेश्वरात तणाव असून, परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी अतिरिक्त पोलिस फौजफाटा मागवला. वाई, भुईंज, पाचगणी, मेढा, सातारा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरा महाबळेश्वरात दाखल झाले. वाईच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यादेखील तातडीने महाबळेश्वरात दाखल झाल्या. शहरात मंगळवारीदेखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सूत्रधारांवर अनेक गुन्हे
टोळीचे सूत्रधार योगेश शिंदे व कुमार शिंदे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्याची नोंद आहे. कुमार शिंदे हे पालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. कुमार शिंदे व त्यांची पत्नी स्वप्नाली शिंदे यांनी कराड येथे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला होता.
टोळीच्या दहशतीची चर्चा
गुन्हेगारी कारवायांमुळे शिंदे टोळीच्या सूत्रधारांना शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर काही काळ टोळीच्या कारवाया थंडावल्या होत्या; परंतु आता या टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. या टोळीच्या दहशतीची चर्चा शहरात सुरू होती.