पुलांवरील विद्युत दिव्यांची निविदा रद्द करा

विशिष्ट ठेकेदार समोर ठेवून राबवली प्रक्रिया : कॉंग्रेसचा आरोप

पुणे  – शहरातील विविध पुलांवर नवीन विद्युत दिवे बसवण्यासाठी महापालिका प्रशासनाने काढलेली निविदा विशिष्ट ठेकेदार कंपनीला डोळ्यांपुढे ठेवून काढण्यात आली आहे. या निविदेला स्थायी समितीनेही डोळे झाकून मान्यता दिली आहे. मात्र, या निविदेमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने ही निविदा रद्द करावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

शहरातील विविध पुलांवर नवीन प्रकाश व्यवस्था बसवण्यासाठी महापालिकेने नुकतीच निविदा प्रकिया राबविली आहे. या निविदामध्ये गुणांच्या आधारे “बजाज’ या ठेकेदार कंपनीस पात्र करण्यात आले. यामध्ये 60 टक्के गुण हे प्रकाश व्यवस्थेची गुणवत्ता, दर्जा आणि उर्वरित 40 टक्के गुण हे दरांसाठी असे निविदेमध्ये नमूद केले होते. या निविदेमध्ये “बिल ऑफ क्वांटिटी’ नुसार “फिटिंग’ किती आणि कशा पद्धतीने असावेत, हे देखील नमूद करण्यात आले होते. या निविदेमध्ये बजाज, सिस्का आणि अन्य एका कंपनीने सहभाग घेतला होता.या निविदेमध्ये प्रथम गुणवत्ता आणि दर्जाची तपासणी करून त्यामध्ये जे ठेकेदार पात्र होतील, त्यांचे दर उघडणे नियमानुसार अपेक्षित होते. मात्र त्या गुणवत्तेत आणि अटीत बसत नसतानाही बजाज कंपनीला संगनमताने सर्वात जास्त गुण देण्यात आल्याचा शिंदे यांचा आरोप आहे. प्रशासनाने हे काम बेकायदेशीर केले आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.


तरतुदीपेक्षा दुपटीची निविदा

निविदा प्रक्रिया राबविताना 100 टक्के निधीची तरतूद उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. स्वत: आयुक्त कार्यालयाकडूनच तसे परिपत्रक जारी करण्यात आले. त्याला स्वत:च प्रशासनाने हरताळ फासला आणि निम्मीच तरतूद असताना ही निविदा प्रक्रिया राबवली. या कामासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद असताना साडेसहा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. याशिवाय या प्रस्तावाला एस्टिमेट कमिटीची मंजुरीही नाही.

…मग नागरिकांचेही काम सुट्टीदिवशी करा

अतिरिक्त आयुक्त आणि विद्युत विभागाच्या प्रमुखांनी खास रविवारी सुट्टीचा वेळ “सत्कारणी’ लावण्यासाठी महापालिकेत येऊन हा तातडीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावासाठी खास सुट्टीचा दिवस या अधिकाऱ्यांनी काढला तर त्यांनी सुट्टीच्या दिवशी नागरिकांनाही भेटावे आणि त्यांचे कामही करावे, असा उपरोधिक सल्ला शिंदे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.