नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने 18 वर्षांपूर्वीचा एक प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर आणला आहे. एका उमेदवाराला एकाच जागेवरून निवडणूक लढवता यावी. त्यासाठी कायद्यात दुरूस्ती करावी, असा तो प्रस्ताव आहे.
संबंधित प्रस्ताव सर्वप्रथम 2004 या वर्षात मांडण्यात आला. त्या प्रस्तावाचा मुद्दा नुकताच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयातील सचिवांशी झालेल्या चर्चेवेळी उपस्थित केला. एकाच जागेवरून निवडणूक लढवण्यासाठीची कायदा दुरूस्ती शक्य नसेल; तर विजयानंतर एक जागा सोडून पोटनिवडणूक लादणाऱ्यावर मोठा आर्थिक दंड आकारला जावा, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे.
सध्या एक उमेदवार दोन जागांवरून निवडणूक लढवू शकतो. मात्र, दोन्ही जागांवर विजय मिळाल्यास संबंधित उमेदवाराला एक जागा रिक्त करावी लागते. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक घेणे भाग पडते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर नाहक भार पडतो. त्याशिवाय, संबंधित जागेसाठी मतदान करणाऱ्या मतदारांवर अन्याय होतो, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.