वेल्हे तालुक्यातील 28 ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरू
वेल्हे : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग चालू असताना यास वेल्हे तालुकाही अपवाद नाही. तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काळात होणार असून गावागावांमध्ये राजकीय रंग चढत चालला आहे. मिनी विधानसभा असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपले गाव कसे आपल्या ताब्यात आहे हे दाखविण्याच्या दृष्टीने. संभाव्य उमेदवारांनी इच्छुकांनी आपले गाव बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून यात किती जणांना यश येते हे येणारा काळच ठरवेल.
मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी अगोदर. ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्याचा विचार करून प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा आपल्या विचारांचा सरपंच कसा होईल याकडे विशेष लक्ष देऊन आहे. तर विविध विभागांमध्ये विकास कामे करण्यासंदर्भातील पत्रव्यवहार सोशल मीडियावर झळकत आहेत. पाच वर्ष झोपी गेलेले भावकीच्या जोरावर जागे झालेत.
गावच्या निवडणुकांच्या बैठका शहरी हॉटेलांमध्ये सुरू आहेत. अनेक ठिकाणी गुप्त बैठकांना पेव आले असून गाठीभेटींना सुरुवात झाली आहे. खऱ्या लढती या सरपंच पदाच्या सर्वसाधारण जागेसाठी होणार असून. राखीव गटातील जागांसाठी मात्र तडजोडी करण्यासंदर्भात गावपातळीवर निर्णय घेतले जातयत. असेच चित्र गावागावांमध्ये पाहायला मिळत आहे.
…तर सरपंचपद बिनविरोध होणार
महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जोमाने उतरणार असल्याचे चित्र सध्यातरी वेल्हे तालुक्यात आहे. ज्या ठिकाणी सरपंचपद हे सर्वसाधारण गटासाठी खुले आहे, अशा ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे. तर ज्या ठिकाणी सरपंच पद हे एखाद्या वर्गासाठी राखीव आहे त्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्याकडे स्थानिकांचा कल असणार आहे.
निवडणूक होणारी गावे व सरपंच पदाचे आरक्षण
बालवड, दापोडे, गोंडेखल, धानेप, गुंजवणे, हारपूड, कोशिंमघर, मोसे. बु, शिरकोली, सोंडे हिरोजी, सोंडे कारला, वेल्हे खु. (सर्वसाधारण). केळद, कोलंबी, पाल. बु. टेकपोळे, वाजेघर बु. (सर्वसाधारण स्त्री). लव्ही, शेनवड, सोंडे माथना, गिवशी, (ना. मा. प्रवर्ग). आंबेगाव खु. चिरमोडी, कोंडगाव, सोंडे सरपाले, वडघर, (ना. मा. प्रवर्ग स्त्री). बोरावळे (अनुसूचित जाती स्त्री). जाधववाडी (अनुसूचित जमाती).
सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक
गावचे सरपंच पद हे थेट जनतेतून निवडण्यात येणार असल्यामुळे सर्वाधिकपणे सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर प्रत्येक ठिकाणी सदस्य पदासाठी उमेदवारांना बोहल्यावर चढण्यावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण भविष्यकाळात सदस्यांना कितपत अधिकार मिळतात याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे. तसेही गाव पातळीवर आज तागायत सरपंच आणि ग्रामसेवक हेच एकहाती कारभार हाकत असतात याची कल्पना इच्छुक सदस्यपदांच्या उमेदवारांना आहे.