30 तारखेला 36 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?

मुंबई : येत्या 30 डिसेंबरला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्तारात 36 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्‍यता आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या आवारात होणार असल्याचे समजते.

सरकार स्थापनेला महिनाभराचा कालावधी होत आला असूनही मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. आता विस्ताराचा मुहूर्त निश्‍चित झाल्याची माहिती आहे. मात्र, विस्तारावेळी संधी मिळणाऱ्या मंत्र्यांची नावे अजूनही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे उत्सुकता आणखीच ताणली गेली आहे.

अशात विस्तारावेळी 36 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती गुरूवारी कॉंग्रेसच्या सुत्रांकडून देण्यात आली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पक्षाच्या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे सूतोवाच केले.

मात्र, अधिक तपशील त्यांनी सांगितला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत 28 नोव्हेंबरला 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांचा समावेश होता.

त्या पक्षांमधील सत्तावाटपाच्या सुत्रानुसार सर्वांधिक 16 मंत्रिपदे शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे समजते. तर राष्ट्रवादीला 14 आणि कॉंग्रेसला 12 मंत्रिपदेच मिळणार असल्याची माहिती आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.