नवी दिल्ली : देशात कोठेही “डिटेंशन सेंटर’ नाही, असे पंतप्रधानांनी खोटे सांगितले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान भारत मातेशी खोटे बोलले, अशी टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुस्लिमांना “डिटेंशन सेंटर’मध्ये पाठवले जात असल्याच्या अफवा कॉंग्रेस, सहयोगी आणि शहरी नक्षली पसरवत असल्याची टीका या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे दिसते आहे.
याच व्हिडीओमध्ये आसाममध्ये तयार होत असलेल्या “डिटेंशन सेंटर’ही दाखवले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्याचा संदर्भ घेऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचा उल्लेख “आरएसएस’चे पंतप्रधान असा केला. “झूठ, झूठ, झूठ’ अशा शब्दात पंतप्रधान भारतमातेशीही खोटे बोलल्याची टीका केली.