शेवगाव – तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या 10 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आजपासून मंगळवारी (दि.25) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.
गोळेगाव ग्रामपंचायतीच्या 5 तसेच भागवत एरंडगाव, जुनी खामपिंपरी, दहीगाव शे, अमरापूर व आव्हाणे खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी सहा ग्रामपंचायतीच्या 10 जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि. 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणे, दि. 3 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, दि. 8 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे.
तर दि. 18 मे रोजी मतदान व 19 मे रोजी मत मोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तालुक्यात सुरु असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीबरोबरच तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या 10 जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्याने सहा गावातील राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.
दोन महिन्यांसाठी निवडणूक
अमरापूर ग्रामपंचायत वगळता अन्य 5 ग्रामपंचायतीची मुदत दोन महिन्यांनी संपणार आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यासाठी निवडणुकीचा आर्थिक प्रपंच उभा करण्यास उमेदवार तयार होतील का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.