कोल्हापूर – महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ कॉंग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेने पोटनिवडणूकीत माघार घेतली असून कॉंग्रेसकडून लवकरच अधिकृत उमेदवार जाहीर केला जाणार आहे.
कोल्हापूरात पोटनिवडणुक कार्यक्रम प्रक्रिया सुरू झाली आहे. जयश्री जाधव यांना बिनविरोध करण्याची मागणी पालकमंत्री पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. तर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली होती. तथापि महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार ज्या पक्षाकडे मतदारसंघ आहे; तेथे त्या पक्षाला आघाडीची उमेदवारी द्यायची, असा धोरणात्मक निर्णय झाला आहे. त्यानुसार हा मतदारसंघ कॉंग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली होती. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. शिवसेनेने माघार घेतल्यामुळे आता येथे भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी सरळ लढत होणार आहे. आप पक्षानेही येथे आपला उमेदवार दिला आहे. आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत करूणा शर्मा या शिव शक्तीकडून लढणार आहेत.