चंदीगड – पंजाबमध्ये उद्या, शनिवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाब मंत्रिमंडळात सामिल होणाऱ्या मंत्र्यांना शपथ देणार आहे. पंजाबच्या मंत्रिमंडळात 8 ते 10 मंत्री सामिल केले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
पंजाबमधील नवीन मंत्रीमंडळात हरपालसिंग चीमा, अमन अरोरा, कुलतार संधवान, सरवजीत कौर मनुके, गुरमीत सिंग मीत हैर, बलजिंदर कौर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय कुंवर विजय प्रताप सिंग, जीवनज्योत कौर आणि डॉ. चरणजित सिंग यांची मंत्रीपदासाठी दावेदारी मानली जात आहे.
आपचे नेते भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. शहीद भगत सिंग यांच्या मूळ गावी खटकड कलांमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यानंतर “आप’ने तीन दिवसीय विधानसभा सत्र बोलावले आहे.
दरम्यान, पंजाबच्या 117 जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने 92 जागांवर विजय मिळवला. पंजाबच्या निवडणुकीत यावेळेस एक विशेष बाब पाहायला मिळाली. ती म्हणजे येथील जिंकलेल्या सर्व आमदारांपैकी एकूण 11 आमदारांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेसला 18 जागा मिळल्या. आप’ने शिरोमणी अकाली दल-बहुजन समाज पक्ष युतीचाही पराभव केला. शिअद तीन तर भाजपला दोन आणि बसपाला केवळ एक जागेवर समाधानी राहावे लागले.