लोणी काळभोरमध्ये लसीकरणासाठी “झुंबड’

तीन दिवसांपासून डोसच उपलब्ध नाही

लोणी काळभोर  -येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन दिवसांत 1544 जणांना करोनाची लस देण्यात आली. यामध्ये मांजरी केंद्रातील 532 जणांचा समावेश आहे. प्रथमच टोकन पद्धत अवलंबल्याने या दोन दिवसांत कोणतीही गडबड गोंधळाविना लसीकरण सुरळीत पार पडले.

परंतु गुरुवार नंतर आजअखेर लस उपलब्ध झालेली नाही. असे असले तरीही नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून लसीकरणासाठी रांगेत उभे राहत आहेत. तसेच त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देताना आरोग्य कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत.

राज्यात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. परंतु लस उपलब्धतेबाबत अनेक अडचणी येत आहेत. लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 मे रोजी लस उपलब्ध झाली. त्यापूर्वी 8 दिवस लसीचा पुरवठा झाला नव्हता.

यामुळे यापूर्वी होणाऱ्या गर्दीचा अनुभव लक्षात घेऊन लसीकरण सुरू होण्यापूर्वी आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व डॉ. रूपाली बंगाळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रांगेत उभे असलेल्या सर्वांना टोकण दिले.

त्यानंतर प्रत्येकाची नोंद करून रक्‍तदाब तपासणी करून टप्प्या-टप्प्याने आत सोडले. यामुळे गर्दी असूनही गडबड गोंधळ झाला नाही. आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व डॉ. रूपाली बंगाळे यांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवार (दि. 5) 902 तर गुरुवारी (दि. 6) 642 असे एकूण 1 हजार 544 जणांना लस देण्यात आली.

यामध्ये मांजरी उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील 532 नागरिकांचा समावेश आहे. गुरुवारनंतर आजअखेर लस उपलब्ध झालेली नाही. दोन दिवसांपासून लस उपलब्ध न झाल्याने आपल्याला दुुसरा डोस कधी मिळणार? या विवंचनेत 45 वर्षांवरील नागरिक दिसत आहेत.

येथे होत असलेली गर्दी टाळण्यासाठी अनेकजण ऑनलाइनचा मार्ग अवलंबताना दिसतात. परंतु अनेकवेळा कोविड पोर्टलला समस्या येत असल्याने त्यांचा हा प्रयत्न असफल होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना अत्याधुनिक मोबाइलचा वापर करता येत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन तेथे नोंद करून लस घेण्यास ते प्राधान्य देत आहेत.

यामुळे आरोग्य केंद्रावर गर्दी वाढत आहे. त्यातच याठिकाणी करोना चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लस घेऊन करोनापासून वाचण्यापेक्षा ही गर्दीच करोनाला निमंत्रण देणारी तर ठरणार नाही ना? अशी भीती व्यक्‍त केली जात आहे.

सुरूवातीला नागरिकांचा लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु जसे करोनाचे रुग्ण वाढू लागले, तसे लसीकरणासाठी नागरिक स्वतःहून आरोग्य केंद्रांकडे येऊ लागले. परिणामी लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मर्यादित स्वरूपात लस आरोग्य केंद्रात उपलब्ध होत असल्याने काहींना विना लसीकरण परतावे लागत आहे. सर्वांना लस कशी मिळेल. यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. परंतु सध्या राज्यात लसीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने आमचाही नाइलाज आहे.
– डॉ. डी. जे. जाधव, आरोग्य अधिकारी, लोणी काळभोर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.