पिंपरी – पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर 70 फुटी भव्य रावणाची प्रतिकृती तसेच कुंभकर्ण व मेघनाथ यांची 60 फुटी प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. या वेळी हजारो नागरिक उपस्थित होते.
माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह तसेच रमेश परदेशी, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, राहुल कलाटे, हर्षल ढोरे, सचिन चिखले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष तुषार कामठे, संतोष कुदळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, पवना बॅंकेचे संचालक शिवाजी वाघेरे, भरत लांडगे आदी उपस्थित होते.
या वेळी सहभागी झालेल्या प्रेक्षकांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये लावणी, गरबा, एलईडी डान्स दिल्ली, झिरो ग्रव्हिटी डान्स ग्रुप मुंबई, बेली डान्स,फायर डान्स आदी चित्तथरारक प्रात्यक्षिकांबरोबर संगीताच्या तालावर सादर झालेल्या नृत्याअविष्काराने अबालवृद्धांनी ठेका धरला. कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे, उमेश खंदारे, शेखर अहिरराव, नितीन गव्हाणे, कुणाल सातव, सचिन वाघेरे, विठ्ठल जाधव, गणेश मंजाळ, श्रीकांत वाघेरे यांनी केले.
लोकसभेची तयारी
गेल्या काही दिवसांपासून माजी नगरसेवक संदीप वाघेरे मावळ लोकसभेसाठी तयारी करत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून याचा उल्लेख करत संदीप वाघेरे यांनी संपूर्ण मावळ मतदारसंघाचा विकास करण्याचे माझे स्वप्न असल्याचे स्पष्ट केले. मावळात पर्यटनाला मोठा वाव आहे. पर्यटनाचा विकास करणे त्या दृष्टीने एकविरा देवी परिसराचे सुशोभीकरण तसेच रायगड जिल्ह्यातील लेणी परिसर सुशोभित करणे, एलिफंटा लेणी विकसित करणे, रेल्वेचे चौपदरीकरण, तरुणांना रोजगार अशा शाश्वत विकासावर भर द्यावा लागणार आहे. मावळ आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही सोडविण्याचे मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.