महाळुंगे इंगळे – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीसाठी नव्याने घाट तयार करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 17) शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम नियोजन तसेच भरघोस बक्षीस असे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहे त्यामुळे परिसरातील गाडा शौकिनांसाठी एक चांगली पर्वणी ठरणार आहे.
घाट तयार करत असताना बैलगाडा शर्यती दरम्यान बैलांना कुठल्याही प्रकारची इजा होऊन दुखापत होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. घाटात दोन्ही बाजूला नागरिकांना बसण्यासाठी उत्तम प्रतीचे कट्टे बांधण्यात आले आहेत. शिवाय घाट संपल्यानंतर बैलगाडा जास्त अंतरावर जाऊ नये यासाठी उंच असे आळे घातले आहेत, त्यामुळे बैलगाडा अडविण्यास मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे गाडा शौकीन नागरिकांसाठी काही अपघात घडल्यास रुग्णवाहिका तसेच डॉक्टर यांच्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महाळुंगे इंगळे येथील बैलगाडा घाट हा एक उत्तम प्रतीचा घाट असून बैलांसाठी सुरक्षित बनवला गेला असल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष अभिषेक जावळे यांनी दिली.