नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने शनिवारी पुन्हा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर छापे मारले. या छाप्यांच्या संबंधात ट्विटरवर बोलताना सिसोदिया यांनी म्हटले आहे की, सीबीआय एजन्सीला मागील छाप्यांमध्ये त्यांच्याविरूद्ध काहीही सापडले नाही आणि यावेळी देखील त्यांना काहीही सापडणार नाहीं कारण आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही.
त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सीबीआय आज पुन्हा माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापे टाकले, लॉकरची झडती घेतली, माझ्या गावात माझ्याविरुद्ध चौकशी केली. तेव्हा काहीही सापडले नाही आणि आताही सापडणार नाही कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही.दरम्यान सीबीआयने मात्र आम्ही तेथे कोणतीही छापेमारी केलेली नाही असे म्हटले आहे.