मुंबई : बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात चाकूच्या धाकावर एका महिलेवर आठ नराधमांकडून सामूहिक अत्याचार करण्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. एवढंच नाही तर महिलेबरोबर असलेल्या व्यक्तीकडील पैसे हिसकावून घेतले. या सर्व दुर्दैवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
बुलढाण्यात घटनेवर बोलताना रोहित पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. याविषयी बोलताना त्यांनी, “बुलढाण्यात ३५ वर्षाच्या महिलेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे केवळ गुन्हा दाखल करण्यासाठी सत्ताधारी गटाच्या आमदाराला तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या द्यावा लागतो.” “हे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं लक्षण आहे. राज्यातील महिला व मुलींची सुरक्षा करता येत नसेल तर या सरकारला एक क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत रोहित पवारांनी सरकार आणि प्रशासनावर टीका केली.
बुलडाण्यात ३५ वर्षाच्या महिलेवर आठ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला.. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे केवळ गुन्हा दाखल करण्यासाठी सत्ताधारी गटाच्या आमदाराला तीन तास पोलिस ठाण्यात ठिय्या द्यावा लागतो.. हे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं लक्षण…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 14, 2023
दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी राजुर घाटात देवीच्या मंदिराच्या परिसरात पीडित महिलेसह आणखी दोनजण थांबले. यावेळी आठजणांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी जवळचे ४५ हजार लुटले. त्यानंतर पीडितेवर अत्याचार केला.
आठजणांपैकी दोघांनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून ठेवला होता. नंतर पीडितेला दरीत नेऊन जबरदस्तीने आठजणांनी आळीपाळीने अत्याचार केला. आरोपींपैकी एक घटनास्थळाच्या जवळच असलेल्या मोहेगावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. इतर सात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. त्या पीडित महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांना मारहाणही करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.