पुणे – ऑटोमोबाइल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि बांधकाम व्यावसायिक गौतम विश्वानंद पाषाणकर (वय 65) हे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पाषाणकर हे कृषी महाविद्यालयाजवळील मोदीबागेमध्ये राहतात. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. तेथून ते जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कारचालकाला पानशेत येथे एका कामानिमित्त पाठवले.
त्यानंतर गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले. तेथून ते बेपत्ता झाले. गौतम पाषाणकर यांच्याविषयी कोणाला माहिती मिळाल्यास किंवा आढळून आल्यास तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी 020-25536263 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.