पुणे – मांजरी परिसरात करोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेकडून येथील चार किलोमीटरचा परिसर बफर झोन केला आहे. या परिसरात साधारण 25 हजार कुटुंब असून, त्यांच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात केली आहे. तसेच पाच ठिकाणी चेकपॉईंट ठेवल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहरात आतापर्यंत करोनाचे 10 रुग्ण सापडले असून, त्यातील 7 शहर आणि जवळच्या परिसरातील आहेत. तर 3 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहे. मांजरी गावाचा परिसर शहरालगत आहे, परंतु जिल्हा परिषदेमध्ये हे गाव असल्यामुळे आरोग्य विभागाने तत्काळ याठिकाणी पाहणी करून रुग्णाच्या घरापासून चार किलोमीटरचा परिसर बफर झोन केला आहे. गावात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विचारपूस केली जात आहे. तसेच, खबरदारी म्हणून आवश्यकता नसेल तर परिसरात जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
दरम्यान, या परिसरातील सर्व कुटुंबांना भेट देऊन त्यांच्या घरक्रमांक, सदस्य संख्या, परदेशातून कोणी आले का? किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत का? तसेच कोणाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहे का याची माहिती लेखी स्वरुपात घेण्यात येणार आहे. त्यामध्ये संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याला नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.
करोना विषाणुच्या प्रादुर्भावापेक्षा त्याबाबतची चुकीची माहितीच सोशल मीडियावर अधिक पसरत आहे. प्रत्यक्षात या विषाणुचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे या अफवा रोखण्यासाठी गावागावांमध्ये जनजागृती कार्यक्रम, फ्लेक्स लावण्यात येत आहे. तसेच अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, डॉक्टर यांच्या मार्फत घरोघरी जावून जागृती केली जात आहे.
प्रमोद काकडे, सभापती आरोग्य विभाग जि.प.पुणे