दहिवडी : आंधळी, ता. माण येथील संजय रामचंद्र पवार (वय 49) आणि मनीषा संजय पवार (वय 45) या दाम्पत्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर दहिवडी पोलिसांनी अवघ्या चार तासांत बापूराव शहाजी पवार या संशयिताला अटक केली. बापूराव हा संजय पवार यांचा चुलतभाऊ आहे.
संजय व मनीषा पवार यांचे आंधळी येथील दरा नावाच्या शिवारात शेत आहे. या शेतातील पिकांना त्यांनी काल (दि. 7) युरिया खत टाकले होते. त्यानंतर पिकाला पाणी देण्यासाठी हे दाम्पत्य विद्युत पंप सुरू करण्यास दाम्पत्य रात्री 10 वाजल्यानंतर गेले होते. तेथे रात्री 10 ते 11 च्या दरम्यान धारदार शस्त्राने या दाम्पत्याच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून, त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. या परिसरातील शेतकरी रविवारी सकाळी 11 च्या सुमारास शेतात जात असताना, शेतात रक्ताच्या थोराळ्यात पडलेले दाम्पत्याचे मृतदेह त्यांना दिसले. शेतात खताचे पोते आणि घमेलेही पडलेले दिसले.
शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना कळवले. त्यानंतर दहिवडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे पथकदेखील आंधळीत दाखल झाले. साताऱ्यातून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दहिवडी येथे पाठवले. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला गती दिली.
संजय पवार यांचा चुलतभाऊ बापूराव शहाजी पवार याच्याशी पूर्वीपासून वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दिशेने तपास सुरू झाला. खुनानंतर संशयित पळून गेला होता. त्याचा माग काढण्यासाठी पोलीस पथके फलटण आणि दहिवडीकडे रवाना झाली. मात्र, संशयित आंधळी गावातच सापडला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पूर्ववैमनस्यातून हा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अवघ्या चार तासांत संशयिताला पकडून, गुन्ह्याची उकल केल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, दहिवडीच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी दहिवडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले.