मुंबई : आजपासून दोन दिवस चालणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत असून यामुळे भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई कऱण्यात आली आहे.
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. तसेच ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली. तालिका अध्यक्ष यांच्याबरोबर धक्काबुक्की, शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.
काही आमदारांनी मला आई- बहिणींवरुन शिवीगाळ केली असून ते माझ्या अंगावर धावून आले. आजचा दिवस माझ्यासाठी काळा दिवस असल्याचं तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटलं.
निलंबनाची कारवाई झालेल्या आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपुते, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, हरीश पिंपळे, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तीकुमार (बंटी) बागडिया, अभिमन्यू पवार यांचा समावेश आहे.
दरम्यान भाजप आमदारांचे निलंबन केल्यानंतर विरोधी पक्षाने सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.