मुंबई – मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात ‘सुलोचना लाटकर’ यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना लाटकर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शनिवारी (3 जून) अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची तब्येत बिघडली आणि अशा स्थितीत त्यांना काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मार्च महिन्यातही सुलोचना यांची तब्येत बिघडली होती.
त्यानंतर त्यांना श्वासोच्छवासाच्या आणि वयोमानाशी संबंधित इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयात 3 आठवड्यांच्या उपचारांनंतर त्या बऱ्या झाल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देखील दिला होता.
दरम्यान, सुलोचना दीदींचे जाणे हे मराठी प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट विश्वात देखील त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते.