न्यूयॉर्क – कर्नाटकामध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर कॉंग्रेस पक्ष तेलंगण आणि अन्य राज्यांमध्येही भाजपचा पराभव करेल. केवळ कॉंग्रेस पक्षच नव्हे, तर भारतातील जनताच द्वेषमूलक विचारांचा पराभव करतील, असे भाकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वर्तवले आहे. वॉशिंग्टन आणि सॅन फ्रान्सिस्को येथे भेट दिल्यानंतर राहुल गांधी न्यूयॉर्कला आले. मॅनहटन येथे ते भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत.
आम्ही भाजपचा नाश करू शकतो हे कर्नाटकच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. आम्ही त्यांचा पराभव केला नाही. तर आम्ही त्यांचा नाश करू शकतो. आम्ही कर्नाटकात त्यांचे तुकडे केले, असे राहुल गांधी एका भोजनाच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले.
कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपने सर्व शक्य ते करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे प्रसिद्धी माध्यमे होती. त्यांच्याकडे आमच्यापेक्षा दसपट अधिक पैसा होता. त्यांच्याकडे सरकार होते. तरिही आम्ही त्यांचा पराभव केला. आता तेलंगणमध्येही आम्ही त्यांचा पराभव करणार आहोत, असेही राहित गांधी म्हणाले. तेलंगणमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तेलंगण पाठोपाठ राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्येही निवडणुका होणार आहेत. तेथेही भाजपचा आम्ही पराभव करणार आहोत, कारण भाजपसारख्या द्वेषमूलक विचारांना आपण स्विकारू शकत नाही, हे भारतातल्या जनतेला लक्षात आले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सत्तेचे ध्रुवीकरण यशस्वी नाही…
विचारांच्या या लढाईमध्ये 2024 मध्ये विरोधकांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत. कर्नाटकमध्ये भाजपने सत्तेचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांनीही तोच प्रयत्न केला होता. पण ते यशस्वी झाले नाहीत, असे सांगून “भारत जोडो’ यात्रेदरम्यान दिलेल्या “मुहोब्बत की दुकान खोलुंगा’ ही लोकप्रिय घोषणाही राहुल गांधींनी दिली.