पुणे – महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर पुण्यात दोन महत्वाच्या पोट निवडणूका होणार असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्यावर्षी 22 डिसेंबरला निधन झाले होते. तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी 3 जानेवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते.
विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. 26 फेब्रुवारी रोजी या निवडणुका पडणार आहेत. तर, दुसरीकडे कसबा आणि चिंचवड विधानसभेत भाजप कडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पाच नावे प्रदेशस्तरावर कळविण्यात आली असल्याचं दोन दिवसांपूर्वीच सांगितलं आहे.
दरम्यान, ही निवडणूक भाजपसाठी अतिशय महत्वाची असून यासाठी भाजपने देखील निवडणूक ताकदीने लढण्यासाठी हालचाल सुरु केली असल्याचं दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत टिळक कुटुंबियांना उमेदवारी मिळणार नसल्याची दाट शक्यता आता दिसून येत आहे. टिळक कुटुंबीय वगळता इतर उमेदवारांच्या नावाची चर्चा सध्या पक्षात सुरू झाली आहे.
यामध्ये ‘हेमंत रासने आणि गणेश बिडकर’ यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती ‘शैलेश आणि मुलगा कुणाल’ यांच्याशिवाय इतर उमेदवारांना खरंच संधी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारपासून सुरू होत असून, 7 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.