पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यातच या गॅंगमधील काही गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. मात्र काल कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तसेच या अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या एका सराइताविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात एकूण ५२ मुले आहेत. त्यातील १२ मुलांची अक्षर ओळख घेण्यात येत होती. तर उर्वरित मुलांचे मेडिकल चेकअप करण्यात येत होते. याच दरम्यान, या केंद्राच्या एका बाजूला रंगकाम सुरु होते. त्यासाठी लागणारी एक शिडी देखील एका भिंतीला लागून ठेवण्यात आली होती. मेडिकलसाठी जाणाऱ्या मुलांमधील एका या या शिडीवर गेली आणि त्याच शिडीचा आधार घेत सात अल्पवयीन मुलांनी पळ काढला.
दरम्यान, संबंधित प्रकार तिथे उपस्थित असणाऱ्या एका कौन्सलरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती तात्काळ संबंधितांना दिली. मात्र तोपर्यंत केंद्रातुन ७ मुलांनी पळ काढला होता. हा सर्व प्रकार १२.३० ते १.१५ च्या दरम्यान घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. यात ७ अल्पवयीन मुलांचा समावेश असून यापैकी एकावर घरफोडी आणि बाकी सर्वांवर हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भाेसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४६) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यात पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राचे निरीक्षण गृह आहे. गंभीर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात ठेवण्यात येते.
हडपसर भागात कोयते उगारून दहशत माजवणाऱ्या सात अल्पवयीन मुलांविरोधात हडपसर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर बालन्याय मंडळाच्या आदेशाने अल्पवयीन मुलांची रवानगी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील निरीक्षणगृहात करण्यात आली होती. अल्पवयीन मुले निरीक्षण गृहातील सीमाभिंतीवर शिडी लावून चढले. भिंतीवरून उड्या मारून पसार झाले. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत.