मुंबई – ‘शासन आपल्या दारी’ शासनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आज (दि.27 जून) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या ‘रोहिणी खडसे’ यांना पोलिसांनी नुकतंच ताब्यात घेतलं आहे.
यासोबतच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या इतरही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच,पोलिसांनी मोठ्या प्रमाणात काळे झेंडे देखील जप्त केले आहेत.
शिंदे-फडणवीसांना जळगाव येथे काळे झेंडे दाखवणार असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहीणी खडसे यांनी गाडीतूनच आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, “आम्ही पक्ष कार्यालयात शांततेत बसलो होतो.
कोणतीही घोषणा दिली नाही, कोणता विरोध दर्शवला नसल्याच त्यांनी सांगितले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजनानिमित्त मुख्यंमंत्री जळगाव दौऱ्यावर असणार आहेत.’ असं देखील खडसे यावेळी म्हणाल्या.