नवी दिल्ली – फिफा विश्वचषक विजेत्या लिओनेल मेस्सीच्या नावाचा सध्या जगभरात डंका सुरु आहे. मागील काही महिन्यांपासून त्याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करत तब्बल 36 वर्षांनंतर विश्वविजेता बनण्याचा मान मिळवला. स्पर्धा जिंकल्यानंतर मायदेशात परतताच मेस्सीसह संपूर्ण संघाचे मोठ्या धूम धडाक्यात स्वागत करण्यात आलं होत. या विजेत्या संघाचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसले.
दरम्यान, मेस्सी आणखी एका वृत्तामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अर्जेंटिनाच्या या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पॅरिसमध्ये 2022 सालचा “फिफा प्लेयर ऑफ द इयर’चा किताब देण्यात आला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लिओनेल मेस्सीने पहिला फिफा विश्वचषक जिंकला. ज्याचे आयोजन कतारमध्ये करण्यात आले होते.
🏆 𝗠𝗘𝗦𝗦𝗜 🏆
#TheBest FIFA Men’s Player Award 2022 goes to Lionel Messi! 🇦🇷 pic.twitter.com/HXEugVH1t9— FIFA World Cup (@FIFAWorldCup) February 27, 2023
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रन्सचा 4-2 असा पराभव केला. त्यासोबतच अर्जेंटिनाने या स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. याअगोदर त्यांनी 1978 आणि 1986 मध्ये विजेतेपद पटकावले होते. गेल्या अनेक दशकांपासून उराशी बाळगलेलं स्टार फुटबॉलपटू मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष यावेळी केला.
दरम्यान, लिओनेल मेस्सी व्यतिरिक्त अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारे त्याचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांची फिफाच्या 2022 वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकासाठी निवड करण्यात आली आहे. लिओनेल मेस्सीने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. यासह त्याने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांच्या विक्रमाची देखील बरोबरी केल्याचं दिसून आलं आहे. रोनाल्डोने 2016 आणि 2017 मध्ये सलग दोन वर्षे हा पुरस्कार जिंकला.