जम्मू- श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर जम्मूपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या झज्जर कोटलीजवळ एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे एक बस पुलावरून खाली पडली. या अपघातात आतापर्यंत बस चालकासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 41 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जम्मूच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा जीएमसी जम्मूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
बस क्रमांक युपी81-सीटी-3537 अमृतसरहून वैष्णोदेवी (कटरा)कडे जात होती. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. हे सर्वजण बिहारची राजधानी पाटणा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बस राष्ट्रीय महामार्ग-44 वरील झज्जर कोटलीजवळ येताच बसचे नियंत्रण सुटले आणि ती पुलावरून खाली पडली.
सीआरपीएफने सांगितले की, सकाळी अपघाताची माहिती मिळताच. आमची टीम तात्काळ येथे पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. तातडीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमच्यासोबत पोलिसांचे पथकही बचाव कार्यात गुंतले आहे. सीआरपीएफ, पोलिस आणि इतर पथकेही येथे आहेत. बचावकार्य सुरू आहे.
रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेहही रुग्णालयात नेण्यात आले आहेत. बसखाली कोणी अडकले आहे का, हे पाहण्यासाठी येथे क्रेन आणली जात आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जम्मूतील झज्जर कोटली येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेतील लोकांच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांना आपल्या सहवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. जखमींना शक्य ती सर्व मदत आणि उपचार देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.