तंत्रशिक्षण विभागाचे आदेश : पालक, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
– व्यंकटेश भोळा
पुणे – यंदा शुल्कवाढ न करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. त्याचप्रमाणे आता राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासकमांनाही करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा विचार करून शिक्षण शुल्क किंवा इतर शुल्कामध्ये कोणतेही वाढ करू नयेत, असे स्पष्ट आदेश तंत्रशिक्षण विभागाने सर्व संस्थांना दिले आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पदविका, पदवी व पदव्युत्तर अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ करता येणार नाही. मानव संसाधन विकास मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दि. 29 एप्रिल रोजी शुल्कवाढी संदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य तंत्रशिक्षण विभागाने तीन दिवसांपूर्वी सर्व विभागीय तंत्रशिक्षण विभागांना परिपत्रकाद्वारे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना शुल्क वाढ न करण्याचे सूचित केले आहे.
करोनामुळे जगासह भारतही आर्थिक संकटातून जात आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिक्षण शुल्क किंवा इतर शुल्कामध्ये कोणतेही वाढ करू नयेत, असे तंत्रशिक्षण विभागाने सर्व शिक्षणसंस्थांना कळविले आहे. त्यानुसार अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही यंदा शुल्कवाढीस स्थगिती दिली आहे. आता व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही शुल्कवाढीस निर्बंध घातल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार नसल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाने सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क व इतर शुल्कात कोणतही वाढ करू नयेत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना यंदा शुल्कवाढ करता येणार नाही. त्याबाबत शैक्षणिक संस्थांना सूचित केले आहे. त्यानुसार शैक्षणिक संस्थांनी कार्यवाही करणे बंधनकारक आहे.
– डॉ. डी. आर. नंदनवार, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, पुणे