रेडा / निमसाखर -इंदापूर शहरात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर आता तो तालुक्याच्या ग्रामीण भागातही हातपाय पसरू लागला आहे. घोरपडवाडी येथे पहिल्यांदाच कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही वैद्यकिय अडचणीमुळे पुणे येथे प्राथमिक तपासणीवेळी बाळंतणीलाच करोना झाल्याचे शनिवारी (दि. 20) निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे घोरपडवाडी भागात येणारे रस्ते बंद करण्यात येणार आहे. गावात अत्यावाश्य सेवा वगळून 28 दिवस दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. घोरपडवाडी येथील एका गरोदर महिलेवर प्राथमिक आरोग्य केंद्र निरवांगी अंतर्गत गरोदरपणाच्या तपासण्या होत होत्या.
महिलेला इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रसुतीच्या पुढील उपचारासाठी या महिलेला पुणे येथील ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेची प्रसुती करण्यात आली असुन. या महिलेच्या केलेल्या स्वॅब चाचणीमध्ये ही महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. या महिलेचा भाऊ बारामती येथे परीक्षा देण्यासाठी जाऊन आला असून या महिलेच्या संपर्कात आणखी कोण कोण आले आहे याचा शोध घेतला जात आहे.
घोरपडवाडी मध्ये करोना पॉझिटिव्ह महिला सापडल्याने ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा, पोलीस पाटील, जंक्शन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पोलीस विभाग, महसूल विभाग तातडीने या ठिकाणी दाखल झाले. सध्या घोरपडवाडी परीसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व ठिकाणे बंद ठेवण्यात
आली आहेत.
कुटुंबातील इतर तीन लोकांना इंदापूर येथील बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची स्वॅब चाचणी घेण्यात येणार असून या महिलेला करोनाचा संर्सग कसा झाला. याची तपासणी केली जाणार आहे. सदरील महिलेला करोना संक्रमणाविषयीचा कोणताही त्रास होत नव्हता. प्रसुतीसाठी पुणे येथील ससुन रुग्णालयात दाखल केले असता घेतल्या गेलेल्या चाचणीमध्ये ही महिला करोना संक्रमीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-सुरेखा पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी, इंदापूर