पुणे – लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विविध मैफिली, कार्यक्रम, व्याख्याने आदी ऑनलाइन होत आहेत. विविध कलेच्या छटा नागरिकांना घरबसल्या पाहायला मिळत आहेत. या सगळ्याबरोबरीने येत्या काळात बालनाट्य संस्कार परीक्षेचे आयोजन देखील यंदा ऑनलाइन करण्यात आले आहे.
दरवर्षी सुट्टीमध्ये छंदवर्ग, नाट्य प्रशिक्षण वर्ग, उन्हाळी शिबिरे आदींचे आयोजन केले जाते. मात्र यंदा लॉकडाऊनच्या कालावधीत ही प्रशिक्षण शिबिरे ऑनलाइन घेण्यात येत आहेत. जगभरात थिएटर इन स्कूल चळवळ सुरू असताना, महाराष्ट्रात मात्र शालेयस्तरावर नाट्यप्रशिक्षणाबाबत उदासीनता दिसून येते. नाट्य परीक्षा म्हणजे ओझे नसून, कला क्षमता जाणून घेण्यासाठी ही परीक्षा हा आनंददायी मार्ग असतो. याच पार्श्वभूमीवर नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे नाट्यशास्त्रावर आधारित परीक्षेचे आयोजन केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
नाट्यशास्त्र शिकायचे म्हणजे फक्त नाटकाम काम करणे नव्हे तर, नाटकात काम करताना भूमिकेचा सर्वांगिण अभ्यास कसा करावा यासाठी शिकावे लागणारे शास्त्र म्हणजे नाट्यशास्त्र आहे.शालेय अभ्यासक्रमात सर्व विषयांच्या परीक्षा आहेत, पण सर्व कलासमावेशक नाट्यकलेची परीक्षा मात्र नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात हा विषय कायमच दुर्लक्षित राहिलेला आहे. या परीक्षेसंबंधी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत इच्छुकांना अकादमीच्या फेसबुक पेजवर अधिक माहिती मिळू शकते, असे अकादमीचे प्रकाश पारखी यांनी सांगितले.