सीमावाद पुन्हा पेटला; शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने

कोल्हापूर  – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला असून कोल्हापूरसह सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. यावरून शिवसेना आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने आले आहेत. बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल-पिवळा ध्वज लावल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा हा ध्वज तत्काळ हटवला जावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यानंतर शिवसैनिकांनी बेळगावमध्ये जाऊन भगवा ध्वज फडकावणार अशी गर्जना केली होती.

कन्नक रक्षक संघटनेने बेळगाव महापालिकेसमोर बेकायदेशीरपणे लाल पिवळा ध्वज लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा रद्द झाला होता. मात्र कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झाले असून कर्नाटकमध्ये घुसून महापालिकेसमोर भगवा ध्वज फडकावणार असा निर्धार केला आहे.

शिवसैनिकांना रोखण्यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापटदेखील झाल्याचे पाहायला मिळाले असून सध्या तणावाचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.