जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र चालूच ठेवत गुरूवारी भारतीय हद्दीत गोळीबार केला. त्यामध्ये भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले. पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत मारा केला. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यातील कृष्णा घाटी क्षेत्राला लक्ष्य केले. पाकिस्तानी गोळीबारात हवालदार निर्मल सिंग मृत्युमुखी पडले.
पाकिस्तानी माऱ्याला भारतीय जवानांनी जबर प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये पाकिस्तानी बाजूची मोठी हानी झाल्याची शक्यता आहे. एक दिवस आधीच पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या अखनूर क्षेत्रात मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे 4 जवान जखमी झाले. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती केल्या जातात. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे.