पार्श्वभूमीवर संचारबंदीचे केले उल्लंघन
पिरंगुट- बोतरवाडी (ता. मुळशी) येथील तरुणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर मुळशी तालुक्यात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. 25) पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार सुनील मगर, पोलीस शिपाई मयूर निंबाळकर नेहमीप्रमाणे संचारबंदी असल्याने उरावडे परिसरात गस्त घालत होते. रात्री सातच्या सुमारास बोतरवडी गावामध्ये एका पारावरच्या कट्ट्यावर गावातील काही तरुण एकत्र येऊन गप्पा मारीत आहेत, अशी माहिती या पथकाला मिळाली. त्याठिकणी जाऊन खात्री केली असता गावातील एका कट्ट्यावर 4 ते 5 जण संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला मास्क न लावता बसलेले दिसले. पोलिसांना पाहताच ते पळू लागले तेव्हा त्यांचा पाठलाग करून त्यातील एकाला पकडले. त्याच्यावर व त्याच्या साथीदारांवर राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचारबंदी लागू केल्यानंतर मुळशीतील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांनी संयम राखून या राष्ट्रीय आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पौड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.