हिंगोली – कोरोना महामारीने भारतासह जगभरात थैमान घातलं आहे. जगभरातीन अनेक देश या जीवघेण्याता व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केलं आहे. भारतात हा लॉकडाऊन तीन आठवडे म्हणजे 21 दिवस चालणार आहे.
दरम्यान, अशा परिस्थिती सुद्धा काही नागरिक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. याच गर्दीला रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागत आहेत. पोलिसांनी तर बळाचा वापर देखील केल्याचे दिसत आहे.
हिंगोली जिल्हयातील कनेरगावनाका येथील चौकीमध्ये काम करत असलेले जमादार साहेबराव राठोड आपलं कर्तव्य बजावून मधुमेहाच्या गोळ्या घेण्यासाठी हिंगोलीत आले होते. यावेळी मुलीसह घरी जात असताना नांदेडनाका भागात एका पोलिस अधिकाऱ्याने जमादार राठोड आणि प्रियंका राठोड यांना बेदम मारहाण केली.
यावेळी, राठोड यांनी मी पोलिस कर्मचारी असल्याचं सांगितल्यानंतरही त्यांना मारहाण सुरुच ठेवली. तर अधिकाऱ्यांनी प्रियंका यांनाही मारहाण केली. या मारहाणीत प्रियांकाच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. सध्या त्यांचा हा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता वरिष्ठ अधिकारी काय भुमीका घेतात याकडे पोलिस खात्याचं लक्ष लागलं आहे.