महापालिकेतील विरोधी पक्षांच्या नगरसेवकांबाबत दुजाभाव; सर्वांत कमी निधी “फ’ प्रभागाला
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार सादर : “क’ प्रभागाला सर्वाधिक निधीची तरतूद
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सन 2020-21 चे अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात असून, या अंदाजपत्रकावर भाजपाच्या दोन्ही आमदारांचेच वर्चस्व असल्याची बाब समोर आली आहे. राज्यातील सत्ताबदलानंतरही विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना दुय्यम स्थान देत दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे. विरोधी पक्षांचे नगरसेवक सर्वाधिक असलेल्या प्रभागांना सर्वांत कमी निधी देण्यात आला असून, भाजपबहुल प्रभागांमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये स्थायी समितीसमोर सादर करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. दोन महिन्यांपासून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाचे भोसरीतील आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचाच या अंदाजपत्रकावर वरचष्मा आहे. महापालिकेमध्ये भाजपाची एकहाती सत्ता असून, प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी आहे. याशिवाय शिवसेना व मनसेचे नगरसेवक पालिकेत आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देण्यात येते. त्या दृष्टीने लेखा विभागाच्या वतीने कामकाज सुरू आहे. महापालिकेच्या सर्व विभागांना अर्थसंकल्पात समाविष्ठ करण्याच्या कामांची यादी सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. तसेच त्यासाठी लागणारा निधी, शिल्लक निधी व आवश्यक खर्च याची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार सर्व विभागांकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार अर्थसंकल्प बनविण्याचे काम सुरू आहे.
पुढील वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये सर्वाधिक कमी निधी हा “फ’ प्रभागाला देण्यात आला आहे. तर सर्वाधिक 256 कोटींचा निधी हा “क’ मुख्यालयाला देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बहुतांश प्रभागातील निधीमध्ये घट करण्यात आली आहे. “अ’ मुख्यालयालाही गतवर्षीच्या तुलनेत 80 कोटी रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली आहे. या प्रभागासाठी 133 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. “ब’ प्रभागासाठी 209 कोटी, “ड’साठी 170 कोटी तर “ई’साठी 165 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी या प्रभागसाठी 301 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. “ग’ प्रभागासासाठी 135 कोटी तर “ह’ प्रभागासाठी 135 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
समन्यायी पद्धतीने अंदाजपत्रक तयार करण्याची गरज असताना यामध्ये दुजाभाव झाल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसचे सरकार असतानाही स्थानिक पातळीवर मात्र या पक्षांना डावलण्यात आल्याचेच अंदाजपत्रकातून उघड झाले आहे. येत्या आठवडाभरात स्थायीसमोर हे अंदाजपत्रक सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर हे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.
“फ’ प्रभागाला केवळ 76 कोटी
“फ’ प्रभागाला सर्वांत कमी निधी देण्यात आला आहे. या प्रभागासाठी अवघी 76 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक ज्या प्रभागात जास्त आहेत. त्या प्रभागांना जास्त निधी देण्यात आला आहे. भाजपचे आमदार असलेल्या प्रभागांमध्ये सर्वांत जास्त निधी दिला आहे. निधीमध्ये दुजाभाव करण्यात आला असून, सर्वांना समान निधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, यामध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षातील सदस्यांना डावलण्यात आल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक दत्ता साने यांनी केला.
ठोस भूमिका घ्यावी लागेल
राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या कामाचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करण्याची मागणी आम्ही केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून आयुक्तांशी बोलणी केली होती. सर्व सदस्यांना समान निधी देण्यासाठी सांगितले होते. राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपची सदस्यसंख्या तीन होती. त्यासोबत शिवसेनेचे पंधरा नगरसेवक होते. त्या वेळी आम्ही सर्व सदस्यांना समान निधी देत होतो. जर येणाऱ्या काळात सर्व सदस्यांना समान न्याय नाही दिला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातूनहआम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल, असे मत विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केले.
कामे करावीच लागतील
माझ्या प्रभागातील बहुतांश कामे ही तातडीने करावयाची आहेत. त्यामुळे ती कामे करावीच लागतील. मात्र, याव्यतिरिक्तही जर काही कामे वगळली असतील तर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नागरिकांच्या दृष्टीने जी कामे होणे अत्यावश्यक आहेत, अशीच कामे सुचविली होती. त्यामुळे ती कामे करावीच लागतील, अशी मागणी माजी महापौर तथा राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी केली.
यंदाचे अंदाजपत्रक किती कोटींचे?
महापालिकेच सन 2019-20 या वर्षाचे अंदाजपत्रक 6 हजार 183 कोटींचे आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या योजना व अनुदानाचा समावेश आहे. सन 2018-19 चे अंदाजपत्रक 5 हजार 235 कोटींचे होते. तर, सन 2017-18 चा अर्थसंकल्प 4 हजार 805 कोटींचे होते. गेली सलग तीन वर्षे अंदाजपत्रक एक हजार कोटींनी वाढत आहे. सन 2020-21 चे अंदाजपत्रक किती कोटींनी वाढणार याकडे लक्ष लागले आहे.
सर्व प्रभागांना समान निधी द्या
संपूर्ण प्रभागामध्ये रस्ते खोदून ठेवले आहेत. ते रस्ते नागरिकांना सुस्थितीत करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी निधीची आवश्कता आहे. जो काही निधी दिला आहे. त्यामध्ये मागच्या कामांची बिले निघणार आहेत. उरलेल्या पैशांमध्ये प्रभागामध्ये विकासकामे करणे शक्य नाही. विरोधकांवर अन्याय न करता सर्व प्रभागांना समान निधी देणे आवश्यक असल्याची प्रतिक्रीया नगरसेवक पंकज भालेकर यांनी व्यक्त केली.
अंदाजपत्रकाबाबत अनेक नगरसेवक अनभिज्ञच
पुढील वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाबाबत नगरसेवकांची तथा पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता हे नगरसेवक अंदाजपत्रकाबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसून आले. माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो, प्रभागात विकासकामे करण्याची गरज आहे, सर्वसाधारण सभेत विरोध करू, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या नगरसेवकांनी दिल्या. त्यामुळे प्रभागातील कामे आणि अंदाजपत्रकाबाबत हे नगरसेवक गंभीर नसल्याचेच दिसून आले.