पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील “करोना’ची साखळी तोडण्यात काही प्रमाणात का होईना यश येऊ लागले आहे. परंतु पुण्यातून पिंपरी-चिंचवड शहरात उपचारासाठी आणि राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे शहरातील उपचारासाठी दाखल असलेल्या “करोना’ रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज दिवसभरात शहरातील दोघांना तर शहराबाहेरील तीन जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील दोन्ही रुग्ण हे पिंपळे गुरव परिसरातील आहेत. तसेच 14 दिवसांच्या उपचारानंतर चार रुग्ण “करोनामुक्त’ झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या गेल्या तीन दिवसांमध्ये काही प्रमाणात घटली आहे. मात्र पुण्यातून वायसीएमध्ये उपचारासाठी येत असलेले संशयित तसेच पिंपरी-चिंचवडमधील नातेवाईकांकडे आलेल्या काहीजणांना बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. चिंचवडमधील माणिक कॉलनीमध्ये नातेवाईकाकडे पुण्यातील गंजपेठ येथून राहण्यास आलेल्या एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याने बाधितांपासून आजपर्यंत लांब राहिलेल्या चिंचवडमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. तर संशयित असलेले सदाशिव व भवानी पेठेतील दोघेजण वायसीएममध्ये दाखल झाले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज (गुरुवारी) शहरातील पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिला आणि त्यांचा 10 वर्षांच्या मुलाला “करोना’ची लागण झाली आहे. “करोना’बाधित महिला त्यांच्या पुण्यातील एका “करोना’बाधित नातेवाईकाच्या वारंवार संपर्कात आल्याने त्यांना व त्यांच्या मुलालाही लागण झाली आहे. पिंपळे गुरवमधील काही परिसर सील करण्यात आला आहे