पुस्तक परीक्षण: फरशीचा तुकडा

– प्रतिनिधी

आजपर्यंत आपल्याला कित्येक पुस्तकांनी स्वप्न बघायला शिकवलं असेल; पण “फरशीचा तुकडा’ हे पुस्तक स्वप्न जगायला शिकवतं. मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकणारे तीन जीवलग मित्र, त्यांच्या कॉलेजच्या शेवटच्या दिवशी फिरायला जातात आणि तेथून त्यांचं आयुष्यच बदलून जातं. तिघांची भेट एका वृद्ध साधूसोबत होते. तो साधू निर्जन भागातील झाडाखाली एक भला मोठा तुटलेला फरशीचा तुकडा पुरताना दिसतो. या विचित्र घटनेचा बोध न झाल्याने शोधबुद्धीने ते तिघे त्या साधूकडे जातात आणि इथेच अखंड विश्‍वाचं गुपित एका वेगळ्याच दृष्टिकोनातून उलगडलं जातं.

मग काय… कथा बदलते, वाट बदलते, जगण्याचा संघर्ष सुरू होतो. स्वप्नांना वळण मिळतं, ध्यास बदलतो, ध्येय ठरतात आणि शेवटी तिघांचं आयुष्य आंतरबाह्य बदलून जातं. शेवटी आपले विचारही पुस्तकाशी समरस होतात.

पुस्तकाला दिलेले “फरशीचा तुकडा’ हे नाव सिद्धहस्त ठरलं आहे. हे पुस्तक डॉ. राज जाधव यांनी लिहिले आहे. या पुस्तकात लेखकाने बोलीभाषा वापरली असल्यामुळे पुस्तक वाचताना आपण गुंतत जातो. कथेत येणारे प्रसंग भांबावून सोडतात. आपण असा विचार कधीच का केला नाही, हा विचार मनात येतो. आपल्यालासुद्धा कथेच्या नायकासारखी एका वेगळ्याच चष्म्यातून दुनिया बघता आली तर? असं वाटत राहतं. पुस्तकातील अनेक प्रसंग लेखकाने असे काही फुलवले की जणू काही आपण चित्रपट बघत आहोत, असं वाटतं. कथेतील पात्राच्या प्रेमात आपण कधी पडतो हे आपल्यालाच कळत नाही.

नायकाने वापरलेल्या उद्योगाच्या कल्पना तर अफलातून आहेत. कथा साधी आणि प्रत्येकाला आपलीच वाटावी अशी आहे. संवाद मार्मिक, थोडक्‍यात खूप काही सांगणारे कित्येक संवाद आहेत. या पुस्तकाची यूएसपी म्हणजे याचं कथानक, लेखकाने इतकं रंजक बनवलं की 170 पानांचं हे पुस्तक एकाच बैठकीत संपवून हातावेगळं करावं लागतं. लेखकाने उत्सुकता शिगेला पोहचेल याची पूरपूर काळजी घेतली आहे. खिळवून ठेवणे, हसवणे, रडवणे, विचार करायला लावणे आणि त्या सोबत काहीतरी हटके शिकायला मिळणे हे सगळं एकाच पुस्तकात तुम्हाला अनुभवायला मिळेल. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे एक उत्तम पुस्तक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.