संडेस्पेशल: चाहुल ऋतुराजची…

– शर्मिला जगताप

ऋतुराज वसंताचे आगमन सर्वांसाठी सुखदायी असते. याच्या आगमनाने शरद ऋतूची गारठवणारी थंडी निघून जाते. हा ऋतू प्रकृतीत नवनिर्माण करतो. याच्या आगमनावेळी वातावरणात जास्त थंडी नसते आणि जास्त उष्णताही नसते. वसंत ऋतूत दरवळणारा सुंगध सर्वांना मोहित करतो. ऋतुराज वसंताच्या आगमनाने जणू पृथ्वी आनंदी होऊन नाचत असते. वृक्ष, वेली, फुले वसंताच्या आगमनाने आनंदी होऊन गाणी गातात. वनउद्यान, बागबगिचे सर्वदूर वसंत ऋतूचा प्रभाव दिसून येतो. या ऋतूत वसुंधरा हिरवा शालू नेसते.

वसंत ऋतूत वृक्षांना नवी पालवी फुटते. बागबगिचांमध्ये नवनवे रंगीबेरंगी फुले वसंत ऋतूत उमलतात. वसंत ऋतूत आंब्यांच्या झाडाला फुलोरा येतो. कोकिळेची कुहूकुहू सर्वदूर ऐकायला येते. तिच्या मंजुळ स्वरात सर्व सृष्टीतील जीव मोहित होतात. तिच्या मंजुळ स्वरात सुतार पक्षी व्यत्यय आणून झाडाच्या खोड्यावर टकटक असा चोचीने आवाज करून शांत वातावरणाचा भंग करतो.

सकाळच्या प्रसन्न वेळी तर वसंताचे रूप पाहाणे एखाद्या अविस्मरणीय क्षणासारखेच असते. सकाळी हिरव्या गवतावर दवबिंदूचे हिरे पसरलेले असतात. त्यातून प्रकाशाचे परावर्तन होऊन पृथ्वीला चकाकी येते. अशा मनमोहक वातावरणात कवीमन जागे होते. आरोग्याच्या दृष्टीनेही हा ऋतू महत्त्वाचा आहे. चहुबाजूचे प्रसन्न वातावरण मनुष्याचे मन ताजेतवाने करून जगण्याची एक नवी उमेद देत असते. प्रकृतीचे मनमोहक रूप पाहूनच वसंताला सर्वश्रेष्ठ ऋतूराज म्हटले जाते.

फेब्रुवारी महिन्याचा उत्तरार्ध, मार्च आणि एप्रिल महिन्याचा पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने आहेत. वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसंतोत्सव सुरू होतो. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत हा सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर आणि मनोहारी वर्णन केले आहे. श्रीकृष्णानेही गीतेत “ऋतूनाम्‌ कुसुमाकरः’ अशी ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. जयदेवानेही वसंत ऋतूचे वर्णन केलेले आहे.

वसंत ऋतू आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश होत नाही. वसंत म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुंदर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले आहे त्याच्या जीवनात वसंत फुलतो.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.