क्रांतिकन्या हौसाताई पाटील हे स्वरूप प्रकाशन पुणे व डॉ. शोभा शिरढोणकर लिखित एक आत्मचरित्र आहे. या पुस्तकाला डॉ. जयसिंगराव पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने त्यांची कन्या हौसाताई पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवले. स्वातंत्र्यांच्या पूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यानंतरही जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे काढून त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला.
क्रांतिकन्या हौसाताई पाटील या कादंबरीतून हौसाताई पाटील यांच्या कर्तृत्वातून आणि नेतृत्वातून एका धाडसी स्त्रीचे रूप पाहायला मिळते. त्या लहानपणापासून सतत संघर्षमय जीवन जगल्या. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील तसेच साने गुरुजी आणि गाडगेबाबा यांच्याबरोबरीने सामाजिक तसेच शैक्षणिक कार्य केले. गावोगावी शाळा काढण्यास कर्मवीरांना मदत केली. त्यानंतर गावोगावी साने गुरुजींच्या विचारांची आणि महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची पाळेमुळे रुजवली. ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलने करून भारतातून त्यांना हाकलून देण्याचे बहुमोल कार्य केले. त्या हैदराबाद मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होत्या.
ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रतिसरकारला मदत करण्यासाठी अनेक मोहिमा काढल्या. गोव्यातून शस्त्रे आणून ती प्रतिसरकारला पुरवली आणि प्रतिसरकारची स्वातंत्र्यलढ्याची तीव्रता तेवत ठेवली. वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर तसेच जी. डी. बापू लाड, नागनाथ नायकवडी आदी सहकाऱ्यांबरोबर अन्यायाविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आंदोलने, मोर्चे काढून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले.
लेखिका डॉ. शोभा शिरढोणकर यांनी हौसाताई पाटील यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचीही मुलाखत घेतली आणि एक धडाडीच्या क्रांतिकारी आणि दुर्लक्षित अशा क्रांतिकन्येचे त्यांनी आत्मचरित्र लिहिले. त्या काळातही स्त्रिया स्वातंत्र्यलढ्यासाठी तसेच अन्यायाविरुद्ध लढत होत्या हे त्यांनी आपल्या लेखणीतून सिद्ध केले आहे. हौसाताई पाटील यांनी सुरली घाट मोहीम, गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला आणि येणाऱ्या संकटांना तोंड दिले याचे सर्वंकष चित्रण या पुस्तकामध्ये केलेले आहे. स्वरूप प्रकाशन, पुणे तर्फे डॉ. शोभा शिरढोणकर लिखित दुर्लक्षित वीर स्त्रियांविषयी दुसरे पुस्तक आहे. यापूर्वी झाशीची विरांगना झलकारीबाई व क्रांतिकन्या हौसाताई पाटील ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.
– प्रतिनिधी