बंगळुरू – कर्नाटकची सत्ता कॉंग्रेसला मिळणे निश्चित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि सर्व मंत्र्यांनी आता पॅक अप करावे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सत्तारूढ भाजपला आव्हान दिले.
कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात भाजपने लोकायुक्तांकडे एक तक्रार दाखल केली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील आधीच्या कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात 35 हजार कोटी रूपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला.
कर्नाटकमधील भाजप सरकारचा अगदी काही दिवसांचाच कार्यकाळ आता बाकी आहे. जनतेला त्या सरकारपासून सुटका हवी आहे. त्यामुळे आता सर्व गुंडाळून जाण्याची तयारी बोम्मई आणि मंत्र्यांनी ठेवावी. आम्ही विधानसभा स्वच्छ करण्यासाठी डेटॉल घेऊन येऊ. तसेच, गोमुत्राने शुद्धीकरण करू. भाजप हा 40 टक्के कमिशनचा ब्रॅंड बनला आहे. पण, ते झाकण्यासाठी त्या पक्षाकडून कॉंग्रेसवर निराधार आरोप केले जात आहेत, असे शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
Pune Gramin : धक्कादायक! 500 रु.कमी दिल्याच्या रागातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून
दरम्यान, सिद्धरामय्या यांनीही भाजपवर निशाणा साधला. आमचा कार्यकाळ आणि भाजपचा कार्यकाळ अशा दोहोंची चौकशी करा. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली आयोग स्थापन करा, असे आव्हान सिद्धरामय्या यांनी दिले.