मुंबई – अभिनेता वरुण धवन त्याच्या दमदार अभिनयामुळे अधिक करून ओळखला जातो. त्याच्या बऱ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या वरूण त्याच्या आगामी ‘व्हीडी 18’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंग दरम्यान वरूण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. वरुणने सोशल मीडियावर पोस्टद्वारे ही माहिती सांगितली आहे.
वरुण धवन दिग्दर्शक एटली कुमारच्या ‘व्हीडी 18’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यादरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली. वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून चाहत्यांना जखमी झाल्याची माहिती दिली. वरुणने त्याच्या जखमी पायाचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये अभिनेता आईस थेरपी घेताना दिसत आहे. याशिवाय त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या पायाला कशी दुखापत झाली याची माहिती सांगताना दिसतो.
या व्हिडिओमध्ये वरुण धवन सांगतो की, ‘शूटिंगदरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली होती. पण माझ्या पायाला कसे लागले हे मला माहित नाही. पण सध्या मी हेच करत आहे.’ व्हिडिओमध्ये वरुण धवन पायावर आइस थेरपी घेत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये वरुणने त्याचा जखमी पाय बर्फाच्या पाण्याने भरलेल्या बेसिनमध्ये बुडवल्याचे दिसत आहे.
दरम्यान, वरुण धवन एटली कुमार दिग्दर्शित ‘व्हिडी 18’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक अॅक्शन, ड्रामाने भरलेला एक मनोरंजक चित्रपट आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.