मुंबई – अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर सलमान आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा प्रोड्युसर करण जोहर असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 25 वर्षानंतर सलमान खान आणि करण जोहर एकत्र काम करणार आहेत.
सलमानच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू वर्धन करणार आहेत. यासाठी करण जोहर, विष्णू वर्धन आणि सलमान यांची चर्चा सुरू असल्याचे म्हंटले जात आहे. तसेच या चित्रपटाचे शुटींग हे या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अद्याप सांगण्यात आलेले नाही. परंतु हा चित्रपट 2024 सालच्या ख्रिसमसमध्ये थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. विष्णू वर्धन यांनी हा चित्रपट केल्यास त्यांचा हा बॉलीवूडमधील दूसरा चित्रपट ठरणार आहे. याआधी त्यांनी शेरशाह चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
शेरशाह चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. त्यानंतर आता विष्णू वर्धन यांचा नवा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, करण जोहर 1998 मध्ये ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नव्हते. त्यानंतर आता तब्बल 25 वर्षांनी सलमान खान आणि करण जोहर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. चाहते देखील त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.