न्यूयॉर्क : स्वित्झर्लंडमधील प्रतिष्ठित मॅटरहॉर्न पर्वताजवळ चढताना 1986 मध्ये एक जर्मन माणूस बेपत्ता झाला. आता 37 वर्षे उलटल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. डीएनए चाचणीनंतर, सापडलेले मृतदेह बेपत्ता 38 वर्षीय गिर्यारोहकाचे असल्याची पुष्टी झाली.
* ‘ही’ व्यक्ती 37 वर्षांपूर्वी बेपत्ता झाली
वालिस कॅन्टोनच्या पोलिसांनी सांगितले की, मृतदेह 12 जुलै रोजी सापडला होता. जर्मेटमधील थिओडुल ग्लेशियरच्या बाजूने ट्रेकिंग करणाऱ्या गिर्यारोहकांनी हा शोध लावला, असे ते म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1986 पासून बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकाची डीएनए चाचणीतून ओळख पटली आहे.
* ‘या’ स्थितीत अवशेष आढळले
सप्टेंबर 1986 मध्ये ट्रेकिंगसाठी 38 वर्षीय जर्मन गिर्यारोहक परत न आल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर या व्यक्तीची ओळख किंवा त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत पोलिसांनी खुलासा केलेला नाही.
बर्फात अडकलेल्या गिर्यारोहकाच्या लाल लेससह शूजची छायाचित्रे पोलिसांनी शेअर केली आहेत. हिमनदी वितळून कमी झाल्यामुळे मृत गिर्यारोहकांचे मृतदेह अनेकदा दिसतात.
अलिकडच्या वर्षांत देशातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याचे स्विस हवामानशास्त्रज्ञ आणि इतर तज्ञांनी म्हटले आहे. यासाठी काही प्रमाणात ते मानवनिर्मित हवामान बदलाला जबाबदार धरतात.
* यापूर्वीही मृतदेह सापडले आहेत
वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे काही दशकांत बेपत्ता गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले आहेत. 2015 मध्ये दोन तरुण जपानी गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले होते. हे मृतदेह 1970 च्या हिमवादळात मॅटरहॉर्नवर बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकांचे होते. डीएनए चाचणीतून त्याची ओळख पटली.