मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अशोक सराफ यांनी मराठी प्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना संपूर्ण चित्रपटसृष्टीत ‘अशोक मामा’ म्हणून देखील ओळखले जाते. नुकतेच 4 जून रोजी अशोक सराफ यांनी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आता अशोक सराफ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी ‘कृतज्ञ मी… कृतार्थ मी’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 29 जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात पडद्यामागील 20 कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्याकडून या कलाकारांना प्रत्येकी 75 हजार रुपये देण्यात आले. या कार्यक्रमाचे अभिनेता अतुल परचुरे आणि डॉ. मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन केले होते.
यावेळी अशोक सराफ म्हणाले की, “या इंडस्ट्रीतील लोक आज आहेत उद्या नसतील पण कोणीतरी या लोकांच्या मागे उभं राहायला हवं असं मला वाटतं, ही आमची कोणालाही मदत म्हणून नाही तर ती त्यांच्यासाठी एक भेट आहे. यामुळे मला कृतार्थ झाल्यासारखे वाटते.” ही कल्पना निवेदिता सराफ यांना सुचली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
अशोक सराफ यांनी 20 रंगकर्मींचा केला सन्मान
उपेंद्र दाते (अभिनेते), बाबा (सुरेश) पार्सेकर (नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार), अरुण होर्णेकर (दिग्दर्शक-निर्माते), प्रकाश बुद्धिसागर (दिग्दर्शक), पुष्पा पागधरे (पार्श्वगायिका), वसंत इंगळे (अभिनेते), सुरेंद्र दातार (संयोजक-निर्माते), सीताराम कुंभार (नेपथ्य व्यवस्थापक), विष्णू जाधव (नेपथ्य साहाय्यक), एकनाथ तळगावकर (नेपथ्य सहायक), किरण पोत्रेकर (लेखक-दिग्दर्शक), शिवाजी नेहरकर (लोकनाट्य कलावंत), हरीश करदेकर (नाट्यकलावंत), अर्चना नाईक (अभिनेत्री), वसंत अवसरीकर (अभिनेते), दीप्ती भोगले (गायिका-अभिनेत्री), नंदलाल रेळे (ध्वनिसंयोजक), रवींद्र नाटळकर (नेपथ्य सहायक), विद्या पटवर्धन (अभिनेत्री), उल्हास सुर्वे (नेपथ्य सहाय्यक) या कलाकारांना अशोक सराफ यांनी मदत केली.