प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी
मुंबई : कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न मिळाल्याने सोलापूरमधील पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. एवढेच नव्हे तर, नाराजी कळवण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना थेट रक्ताने लिहिलेले पत्र पाठवण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी झाला. मात्र, तिसऱ्यांदा आमदार बनलेल्या प्रणिती यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे सोलापूरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रणिती यांच्या समर्थक असणाऱ्या कॉंग्रेस नगरसेविका फिरदौस पटेल यांनी सोमवारीच पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला.
त्यापाठोपाठ मंगळवारी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी सोनियांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवल्याची माहिती समोर आली. प्रणिती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे त्यांचे वडिल सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षकार्यासाठी नेहमीच कठोर मेहनत घेतली.
त्यांची कॉंग्रेस आणि पक्षनेतृत्वावरील निष्ठा कायम आहे. मात्र, पक्षाकडून त्यांना दुर्लक्षिले जात आहे. शिंदे यांची राज्यसभेवर नियुक्ती केली जावी. तसेच, प्रणिती यांच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवली जावी, अशी मागणी त्या पत्रातून करण्यात आली आहे.