पुणे – श्री तिरूपती नागरी सहकारी पतसंस्थेने संस्था स्फूर्तीस्थान स्व. रामगोपालजी पुंगलिया यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ सोमवार पेठ येथील श्री संत गाडगे महाराज आकुल धर्मशाळा येथे बुधवारी (दि.26) रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरास रक्तदात्यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांच्या हस्ते व धन्वंतरी हाॅस्पिटलचे डाॅ. मनिष कुलकर्णी, इंद्रायणी को. ऑप. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. एस.बी. चांडक, खेड बु.चे सरपंच गणेश धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुगलकिशोर पुंगलिया, संस्था संचालक मंडळ, सल्लागार, संस्थेचे सभासद, खातेदार, पदाधिकारी व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.
शिबीराचे उद्घाटक शहाजीराव क्षीरसागर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेले हे रक्तदान शिबीर सर्व सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल. दरम्यान, या शिबीरात 1271 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
श्री तिरूपती नागरी सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा असून संस्थेच्या एकूण सहा शाखा आहेत. महाराष्ट्र शासनाकडून पुणे व सोलापूर या जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून दिला जाणारा ‘सहकार भूषण’ पुरस्कार सन्मानित पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच संस्था आहे. संस्था अध्यक्ष म्हणून संतोष चोपडा, उपाध्यक्ष गोविंद मुंदडा, महाव्यवस्थापक उमेश वाघे, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, कर्मचारी वर्ग सहकार्याने संस्थेचे कामकाज पाहतात.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..