‘जनहितासाठी पाठिंबा पण किमान ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या,’; भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : राज्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला भाजपाने पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. सरकारच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करतानाच ‘जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या,’ असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला काही सवाल केले आहेत.

महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा जाहीर करताना काही शंकाही उपस्थित केल्या आहेत. उपाध्ये यांनी ट्वीट करून राज्यातील वेगवेगळ्या घटकांबद्दल आणि उपाययोजनांविषयी सरकारला उत्तर मागितले आहे.

“जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी दया… कठोर निर्बंधांच्या काळात कोणत्या आरोग्य सुविधांची उभारणी करणार? रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार,कमाईची व्यवस्था? या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, वितरण यांविषयीचा कार्यक्रम निश्चित केला आहे का? रुग्णांसाठी आवश्यक असलेली मदत केंद्रे व औषधे उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण केली आहे का? पैशाअभावी उपचारांविना कोणीही राहणार नाही याची हमी सरकार देईल का?,”असे प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.