लखनौ – कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. प्रियांका यांनी म्हटले की, योगी हे आरोग्य सुविधा सुधारण्याऐवजी त्या लपवण्यातच धन्यता मानत आहेत.
एका रुग्णालयात पावसाचे पाणी साचले असूनही तेथील कर्मचारी काम करीत असल्याचा व्हिडिओ प्रियांका यांनी गुरुवारी ट्विटर अकाउंटवर टाकला आहे. तसेच आरोग्य सुविधा उच्च दर्जाच्या असाव्यात असे त्यांनी लिहिले आहे. बरेली, गोरखपूरमधील अनेक रुग्णालयांमध्ये अशाच प्रकारची स्थिती असल्याचे दिसले आहे. लखनौमधील आरोग्य सुविधांवर भाषण ठोकणारे मुख्यमंत्री योगी यांना ही स्थिती सुधारावी असे वाटतच नाही, असे प्रियांका यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील लखनौ आणि गोरखपूर या दोन प्रमुख शहरांत रुग्णालयांतील बेड्स फुल्ल झाले आहेत. करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे रुग्णालयांची अशी वाईट स्थिती चिंताजनक आहे. तीन महिने अगोदरच विचारलेले प्रश्न आज सत्यात उतरले असल्याचेही प्रियांका यांनी म्हटले आहे.